नाशिक - जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि शाळेत मुलांना पाठवण्याच्या पालकांच्या संमती पत्रावर नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू कराव्यात की नाही? याबाबतचा निर्णय उद्या (22 नोव्हेंबर) होणाऱया प्रशासकीय बैठकीत घेणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - नाशिक : मनपाच्या ऑनलाइन महासभेला मनसे नगरसेवकांचा विरोध
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. तसेच शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी संमती पत्र मागण्यात येत असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणे शहरात शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, नाशिकमध्ये याबाबत उद्या जिल्हा प्रशासनाची तातडीची बैठक घेणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना सागितले.
भुजबळ यांनी उद्याच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील शाळा, संस्था, शिक्षक आणि पालक यांचा शाळा सुरू करण्याबाबतचा आढावा सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
सरकार संमती पत्र मागून जबाबदारी झटकत नाही
जगातील अनेक देशात कोरोना वाढत आहे. शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास अनेक पालकांचा विरोध आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात कोरोनाची लागण होणार नाही अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. शाळा पालकांकडून संमतीपत्र मागून सरकार आपली जबाबदारी ढकलत नाही, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.