नाशिक - विदेशातून आलेल्या दहा संशयित रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून आतापर्यंत 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच संबंधितांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात नऊ तर डॉ.झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये एक संशयित रुग्ण दाखल झाला आहे. या सर्वांना खोकला, सर्दी, ताप तसेच घशाला त्रास होत असल्याची लक्षणे आढळली आहेत. या रुग्णांच्या घशातील स्त्राव वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आला असून प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई तसेच पुण्यात अनेक जणांना कोरोनाची लागण झाली असून यामुळे जवळच असलेल्या नाशिकमध्ये देखील त्याचा प्रादुर्रभाव होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
आतापर्यंत चाचणी करण्यात आलेल्या 31 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र गुरुवारी रात्री उशिरा जर्मनी, अमेरिका, लंडन या देशांतून प्रत्येकी एक तर मलेशिया,अबूधाबीतून प्रत्येकी दोन संशयित नव्याने दाखल झाले आहेत. याचसोबत फिनलँड दौऱ्यावरून आलेल्या तिघांना देखील दहा संशयित नव्याने दाखल झाले आहेत. या सर्वांना सर्दी, खोकला, ताप, थकवा यासारख्या आरोग्याच्या तक्रारी जाणवत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.