नाशिक - 'नाशिक महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने खोटी आश्वासने दिली. आऊटसोर्सिंगच्या नावाखाली ठेकेदारी पद्धतीतून भ्रष्टाचाराला चालना दिली' असा आरोप काँग्रेसने केला आहे. याविरोधात काँग्रेसने पालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर जोरदार आंदोलन केले आहे. आउटसोर्सिंगच्या आडून होणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
हेही वाचा - ठाण्यात 'थर्टीफर्स्ट'च्या सेलिब्रेशनवर ड्रोनची नजर
घनकचरा व्यवस्थापन विभागातील ठेका रद्द करावा
'घनकचरा व्यवस्थापन विभागातील ठेका रद्द करण्यात यावा. मूल्य निर्धारण व कर संकलन विभागामार्फत घरपट्टी व पाणीपट्टीचे आउटसोर्सिंग करण्याचा घालण्यात आलेला घाट रद्द करावा. शिक्षण मंडळामार्फत मनपा शाळेतील बचत गटाचे काम काढून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले आहे, ते रद्द करून बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे,' यासह अनेक मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मनपा आयुक्त या निवेदनाची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करणार का, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - '31 डिसेंबरला रात्री 11 नंतर घराबाहेर पडू नका; कारवाई होणार'