नाशिक - राज्य शासनाने सर्वत्र कर्फ्यु घोषित केल्यानंतरही त्याची पूर्णत: अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. शहरात जमावबंदीचा नियम झुगारून नागरिकांनी भाजी विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र नाशिककरांनी हे झुगारून ठिकठिकाणी बाजारपेठांमध्ये गर्दी केली.
अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. यामध्ये दूध, भाजीपाला आणि किराणा दुकान तसेच मेडिकल व हॉस्पिटल सुरू रहाणार आहे. तरिही नागरिकांनी भाजीपाला मिळणार नसल्याच्या अफवा पसरवून आज बाजारात गर्दी केली होती.
रविवारी देशभरात लागू करण्यात आलेला कर्फ्यु शहरात मोठ्या प्रमाणात पाळण्यात आला. मात्र, पुढच्याच दिवशी सर्वजण रस्त्यावर उतरल्याचे चित्र होते. अखेर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली; आणि नागरिकांवर कारवाई केली.