नाशिक - छत्रपती संभाजी म्हणून नाही तर मराठा समाजाचा सेवक म्हणून येथे आलो आहे. कुटुंब प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. समाजाचे नेतृत्व करण्याचे मी अतिशय नम्रपणे टाळतो. पण आरक्षणाची लढाई शेवटपर्यंत लढेल, असा विश्वास छत्रपती खा. संभाजी राजे यांनी मराठा समाजाला दिला.
औरंगाबाद रोड येथील मधुरम बॅक्वेंट हाॅलमध्ये आयोजित मराठा क्रांती समन्वय मोर्चाच्या बैठकित ते बोलत होते. ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून मी तुमच्या सोबत राहणार. राज्यातील सर्व संघटनांनी एकत्र बसून चर्चा करणे आवश्यक आहे. भावनिक व्हायचे नसते. तर काही वेळेस गनिमी काव्याने काम करायचे असते. दिल्लीतल्या पहिल्या शिवजयंतीला स्वतः राष्ट्रपती आले. राष्ट्रपती आणी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख यांनी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. हा महिमा शिवाजीमहाराज यांच्या नावाचा आहे. समाजातील सर्व विद्वानांना एकत्र करुन वेगवेगळ्या प्रेशर टाकणाऱ्या समिती तयार करू. दोन्ही छत्रपती एकच आहेत. आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा इशारा त्यांनी नेतृत्वावरुन समाजात फूट पाडणार्यांना दिला.
मी मराठा समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आजपर्यंत मी मॅनेज झालेलो नाही. मॅनेज झालो तर छत्रपतींचा वंशज म्हणून घेण्याची लायकी नाही. अंगावर पहिला वार माझ्यावर होऊ द्या. मग तो गोळीचा होऊ दे की तलवारीचा. छत्रपती संभाजी ही मोहीम हाती घ्या, असे सांगा, मी समाजाचा सेवक म्हणून ती बजावेल, असे ते यावेळी म्हणाले.