नाशिक - जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येनंतर आज केंद्रीय पथक जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले. या पथकाने शासकीय अधिकाऱ्यांसोबत एकत्रित बैठक घेतल्यानंतर शासकीय रुग्णालय आणि जिल्ह्यातील हॉटस्पॉटची पाहणी केली आहे.
शासकीय रूग्णाल आणि हॉटस्पॉट परिसराची केली पाहणी
नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी आज केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रोग निवारण संस्थेचे विशेष पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. या पथकाने नाशिकमधील जिल्हा रुग्णालय पालिका रुग्णालय आणि शहर तसेच जिल्ह्यातील हॉटस्पॉटची पाहणी केली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात प्रति दिन ४०० ते ६०० कोरोना बाधितांची भर पडत असल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पथकाने ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचीही माहिती घेतली आहे.
पथक उत्तर महाराष्ट्राचा घेणार आढावा
नाशिकमध्ये आलेल्या या पथकाने सुरुवातीला जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज आणि शहारतील हॉट स्पॉटला असलेल्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
नाशिक शहर आणि जिल्ह्यातील आढावा घेतल्यानंतर हे पथक उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार या तीन जिल्ह्यांसह औरंगाबादमध्ये देखील जाणार आहे. या पथकात राष्ट्रीय रोग निवारण संस्थेचे संचालक पी. रवींद्रन, राज्याचे आरोग्य संरक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्यासह इतर तीन सदस्य असलेले अधिकारी या पथकासोबत आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक रत्ना रावखडे यांनी त्यांना मागील कोरोना परिस्थिती व विद्यमान कोरोनाची परिस्थिती याबाबतची माहिती दिली आहे. हे पथक राज्यामध्ये कोरोना परिस्थितीचे हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यातील मालेगाव येथे देखील पाहणी करणार आहे.
हेही वाचा - मनसुख हिरेनची हत्या झाल्याचा संशय? दोन मोबाईलचे दोन वेगवेगळे लोकेशन