नाशिक : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी कंबर कसली आहे. सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरून त्यांनी करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल तसेच नागरिकांवर सक्तीने कारवाई करत सुमारे 41 हजारांचा दंड वसूल केला.
शनिवार व रविवारचा बंद यशस्वी
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून नाशिक जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी 8 मार्च रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत सर्व दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि आस्थापना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला काही व्यावसायिकांनी या आदेशाचे पालन केले नाही. मात्र शनिवार आणि रविवार जिल्हा प्रशासनाने केलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडूनही कारवाईचा इशारा
जिल्ह्यातही कोरोना प्रतिबंधक नियमावलींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. सोमवारपासून अत्यावश्यक सेवेसह कोणत्याही दुकानांसमोर गर्दी दिसल्यास जिल्हाप्रशासनाचे पथक संबधितांवर कारवाई करेल असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. तसेच विनामास्क आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. रविवारी सायंकाळी नाशिककरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलींचे पालन करण्याचे आवाहन केले. जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहतील. तर प्रत्येक शनिवार-रविवार बाजारपेठा बंद राहतील. कोरोनाचा आलेख खालावत नाही तोपर्यंत हे निर्बंध लागू असतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - राज्याची चिंता वाढवणारी आकडेवारी; रविवारी 16 हजाराहून अधिक कोरोनाबाधित