नागपूर - पश्चिम नागपुरातील अनेक वस्त्यांना डेंग्यू आणि मलेरियाने ग्रासले आहे. सुरेंद्रगढ, मानवसेवा नगर व गोविंदा गौरखेडे काॅम्पलेक्स या वस्त्यांमध्ये प्रत्येक पाचव्या घरी डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. अनेक ठिकाणी कचर्याच्या डंपिंगमुळे घाण पसरली आहे. या शिवाय ड्रेनेज लाईन, उघडी गटारे, अर्धवट नालेसफाई यामुळे संपूर्ण परिसरात डासांच्या प्रादुर्भावात वाढ होत असून डेंग्यू आणि मलेरियाला वाढीस पोषक वातावरण ठरत आहे. मात्र महानगरपालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. पंरतु डेंग्यू मलेरियाचा संभाव्य धोका ओळखून सुरेंद्रगढ परिसरातील युवकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी कंबर कसली आहे. येथील जनहित या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांंनी घरोघरी जाऊन डेग्यू मलेरियाच्या डासांची पैदास रोखण्यासाठी औषध फवारणाची उपक्रम सुरू केला आहे, त्यांच्या या आरोग्यहिताच्या कामगिरीचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा...
नागपूर महानगरपालिकेतर्फे संपूर्ण परिसरात डेंग्यू आणि मलेरियाचे सर्वेक्षण झालेले नाही. केवळ औपचारिकता म्हणून एखाद दुसर्या वस्तीत आठ ते दहा घरांपर्यंत महानगरपालिकेची चमू पोहोचली आहे, अशी तक्रार नागरिकांमधून केली जात आहे. त्यातच सुरेंद्रगढचा मोठा भाग हा झोपडपट्टीचा आहे. अरुंद व दाटीवाटीच्या ठिकाणी लोक रहातात. याठिकाणी मनपाचे कर्मचारी अजूनही पोहोचले नाहीत. शिवाय कुठल्याही प्रकारची औषध फवारणी किंवा फाॅगिंग होतांना दिसत नसल्याची तक्रार तेथील रहिवासी करत आहेत. मात्र पावसाळा असल्याने या ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष - अभिजित झा
नागपूर महानगरपालिकेचे प्रशासन असंवेदनशील असल्याचा आरोप जनहितचे संयोजक अभिजीत झा यांनी केला आहे. डेंग्यू आणि मलेरियाशी लढण्यासाठी मनपाकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वेक्षण, औषध फवारणीच्या नावावर केवळ औपचारिकता पूर्ण केल्या जात आहेत. सुरेंद्रगढबद्दल मनपा अधिकारी व पदाधिकार्यांचा व्यवहार भेदभावपूर्ण आहे. स्थानिक नगरसेवकांनी संपूर्ण प्रभाग वार्यावर सोडला आहे. जनप्रतिनिधी म्हणून कुठलीही जबाबदारी पार पाडण्यासाठी ते तयार नाहीत. लोकांच्या आरोग्याबद्दल त्यांना अनास्था आहे. महापालिकेने दुर्लक्ष केले तरी जनहितचे युवक घराघरापर्यंत जातील. औषध फवारणी, सर्वेक्षण व जनजागृतीच्या माध्यमातून आपला परिसर डेंगू व मलेरियामुक्त करण्याचा जनहितचा संकल्प आहे.