नागपूर - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंधांची गरज आहे. लॉकडाऊनला लोक गांभीर्याने घेत नसतील तर निर्बंध कडक केले पाहिजे, असे स्पष्ट मत राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. ते नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलते होते. अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद कराव्या लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, मध्यप्रदेशमध्ये तहसीलदारांमार्फत अत्यावश्यक सेवेतील लोकांना पेट्रोल देण्यात येत आहे. तसाच निर्णय येथेही घेण्यात यावा. पेट्रोल डिझेल मिळाले नाही तर लोक फिरू शकणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. ही परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली आहे. यामुळे लोक ऐकणार नसतील कडक निर्णय घ्यावे लागतील. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मोठया प्रमाणात भाजी बाजार किंवा किराणा दुकानात गर्दी होत आहे. लोक ऐकत नसेल तर किराणा दुकानसुद्धा बंद करावे लागतील. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली लोक सुसाट फिरत असतील तर लॉकडाऊनचा उपयोग काय? असाही सवालही पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
पुढे पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत लोकल सेवा ही अत्यावशक सेवेतील लोकांसाठी सुरू केली होती. तिथेही गर्दी होत असेल त्याचाही पुनर्विचार करावे लागेल. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी निर्बंध कठोर करावेच लागतील लागतील.
हेही वाचा-कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करून मदत दिली पाहिजे
महामारी ही राष्ट्रीय आपत्तीच आहेच. महाराष्ट्रासारखी परिस्थिती ही गुजरातमध्ये आहे. तिथे 25 रुग्णवाहिका वेटिंगवर आहेत. मध्यप्रदेशचे रुग्णही नागपूरात आहेत. चंद्रपूरचे रुग्ण तेलंगणात चालले आहेत. तेलंगणाचे रुग्ण सावंगीत आहेत. हीच परिस्थिती सर्वत्र आहे. यामुळे पंतप्रधान यांनी राष्ट्रीय आपत्ती म्हणून देशाकडे पंतप्रधानानी पाहिले पाहिजे. राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करून मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा-कोविड सेंटर रिअॅलिटी चेक : मुलुंड कोविड सेंटरमध्ये 450 खाटा रिक्त
राज्यात कोरोना महामारीची भयावह स्थिती-
राज्यभरात १५ दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या अनेक भागात लोक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या नवीन रुग्णांची रोज वाढणारी संख्या, ऑक्सीजन, रेमेडेसीवीरचा तुटवडा, रुग्णालयात खाटांची कमी संख्या अशा समस्या राज्यात ठिकठिकाणी दिसत आहेत.