नागपूर - नागपूरच्या राजकारणात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख विरुद्ध काँग्रेस नेते आशिष देशमुख असा संघर्ष नेहमीच बघायला मिळतो. मात्र राज्यात आघाडी सरकारमध्ये असलेल्या दोन्ही सहभागी असल्याने गेल्या काही महिन्यांपासून हा संघर्ष थांबला होता. मात्र काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी त्यांचे काका तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने हा संघर्ष पुन्हा नव्याने पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यातही आशिष देशमुख यांनी भविष्यात काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडी की सुरुवात नागपुरातून झाल्याचे बघायला मिळते आहे.
'गृहमंत्री कोणतीही कारवाई करत नाहीत'
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, की काटोल मतदारसंघात गृहमंत्री विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले आहेत. ते गृहमंत्री असताना काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झाले आहेत. सट्टा, अवैध दारू, वाळूच्या अवैध धंद्यात राष्ट्रवादी काँग्रेस नेते गुंतले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मतदारसंघातील महिलांची ओरड सुरू असतानादेखील गृहमंत्री कोणतीही कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात माझे काका अनिल देशमुख यांच्याशी बोलूनदेखील काही होत नसल्याने लवकरच काटोलच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेतदेखील आशिष देशमुख यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीच्या परिवार संवाद कार्यक्रमावर आक्षेप
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते राष्ट्रवादी परिवार संवादाच्या नावाने कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. असाच एक मेळावा काल काटोल मतदारसंघात त्यांनी घेतला. यावर आशिष देशमुख यांनी आक्षेप नोंदविला आहे. राज्याच्या सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतील, तर आम्हीदेखील राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार उभे करण्याकरिता समर्थ असल्याचे म्हटले आहे.
कोटोल मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी?
गेल्या वर्षभरात आशिष देशमुख काटोल किंवा नागपूरच्या राजकारणात पडद्यामागे राहून सक्रिय होते. मात्र आता ते पुढे येऊन मित्र पक्षाचे आमदार तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत असल्याने येत्या काळात काटोल मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आशिष देशमुख यांच्या राजकीय प्रवास
2014च्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी अर्जावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना पराजित करत ते विधानसभेत निवडून गेले होते, मात्र साडेतीन वर्षातच त्यांचा भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षाभंग झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने त्यांनी दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना 54 हजाराच्या मताने पराभव स्वीकारावा लागला होता.