नागपूर - गणेश पेठ पोलीस स्थानक अंतर्गत येत असलेल्या राम झुला येथे भरधाव रुग्णवाहिकेच्या धडकेत आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
पोलीस सूत्रांची माहिती अशी, की हा अपघात रात्री उशिरा घडलेला आहे. विनायक वासुदेव मारशेट्टीवार हे त्यांच्या पाच वर्षीय नातू सिद्धार्थ ज्ञान दीपक देशमुख याला घेऊन अॅक्टिवा दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या रुग्णवाहिकेने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विनायक मारशेट्टीवार आणि त्यांचा नातू सिद्धार्थ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरता पाठवून वाहन चालक कमला प्रसाद तिवारी याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.