नागपूर - नागपूर जिल्ह्यात ब्रेक द चेन अंतर्गत कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंधांच्या नावावर दुकाने बंद करण्यात आली आहेत. शासनाच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. दुकाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आज व्यापारी रस्त्यावर उतरले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान यावेळी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
व्यापाऱ्यांचा संचारबंदीला विरोध
नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला अनेक बंधने घालून दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी व्यापाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आता, प्रशासनाकडून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व दुकानदारांना त्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांना यापूर्वी देखील संचारबंदीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, आणि आता देखील संचारबंदीमुळे दुकाने बंद ठेवण्याची वेळ आल्याने व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी बर्डी परिसरात चांगलाच गोंधळ उडाला, व्यापाऱ्यांनी दुकानांपुढे गर्दी केली होती. दरम्यान पोलिसांनी व्यापाऱ्यांची समजून काढत, नियम न मोडण्याची विनंती केली. दरम्यान दुकाने उघडण्याची परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - अर्ध्यावरती डाव मोडला... संसार थाटण्यापूर्वीच वराचं निधन, आजच होतं लग्न