नागपूर - नागपूर महानगर पालिकेतील भाजपाचे नगरसेवक संदीप गवई यांच्या घरी चोरट्यानी लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी तब्बल 90 किलो वजनाची अख्खी तिजोरीच पळवली आहे. या घटनेची तक्रार गिट्टीखदान पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नागपूर महापालिकेतील श्रीमंत नगरसेवक म्हणून गवई ओळखल्या जातात. सेमीनरी हिल्सच्या मालाबर हिल परिसरात त्यांचा आलिशान बंगला आहे. याठिकाणी ते कुटुंबासह राहतात. नगरसेवक संदीप गवई हे कुटुंबासह मुंबईला गेले असताना काही अज्ञात चोरट्यांनी 90 किलो वजनाची तिजोरीच पळवली आहे. त्या तिजोरीमध्ये 32 लाखांच्या स्वर्ण आभूषण असल्याचा अंदाज आहे.
बंगल्यावर पाळत ठेवून केली चोरी
संदीप गवई यांच्या बंगल्यात जलतरण तलावाचे काम सुरू असल्याने मजदूर काम करत होते. गवई मुंबईवरून परत आल्यानंतर त्यांनी घरात तिजोरी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी विचारपूस केली. मात्र कुणीही उत्तर देत नसल्याने त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. या घटनेत पाळत ठेवणारे सहभागी असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा - आरोग्य विभागाच्या परीक्षेत सावळा गोंधळ : भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा नागपुरात राडा