नागपूर - गेल्या दहा दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल काही निर्बंध लावले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होतो आहे, त्या जिल्ह्यात कडक उपाययोजना करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले असताना, भाजपचे आमदार समीर मेघे यांनी सरकारच्या या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात कोरोनाचा नवीन स्ट्रेन आल्याची चर्चा सुरू आहे, मात्र हा कोरोना स्ट्रेन नसून अधिवेशन स्ट्रेन असल्याचा आरोप मेघे यांनी केला आहे. अधिवेशनामध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिम्मत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही, त्यामुळे कोरोनाची भीत दाखवली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारने जाणीवपूर्वक टेस्टिंग वाढवली
गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता, रुग्ण संख्यादेखील रोडावली होती. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधी अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. ज्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचं बघायला मिळाल होत, त्यावेळी टेस्टिंगची संख्या देखील कमी करण्यात आली होती. मात्र आता अधिवेशनाच्या तोंडावर सरकारने टेस्टिंगची संख्या दुप्पट केल्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये देखील वाढ झाली, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचा आरोप देखील यावेळी समीर मेघे यांनी केला आहे. दरम्यान यातून अधिवेशन लवकर गुंडाळण्याचा घाट घातला जात असल्याचे त्यांनी म्हटले.