नागपूर - विधान परिषद निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ( Legislative Council Election Results 2021 ) केवळ ५५४ मतांची मोजणी करायची असल्याने येत्या दोन तासात निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. त्यामुळे विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार या संदर्भात काहीच वेळातच चित्र स्पष्ट होईल.
मतदानाची टक्केवारी ९८.९३ इतकी
या निवडणूकीत एकूण ५६० मतदारांची नोंद आहे. त्यापैकी ५५४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ९८.९३ इतकी राहिली होती. ज्या सहा नगरसेवकांनी मतदान केलं नाही त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेतील बहुजन समाज पार्टीच्या चार नगरसेवकांचा समावेश होता. तर, जिल्हा परिषदेच्या एका सदस्यानेसुद्धा मतदान केलेले नव्हते. शिवाय एक मत बाद झाल्याने ५५४ सदस्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.
अशी होईल मतमोजणी
या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला एकूण मतदानाच्या 51 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. मात्र, असे झाल्यास दुसऱ्यापासून तिच्या उमेदवारला मिळणाऱ्या मतांची मोजणी करावी लागते. एकूण चार टेबलवर ही मतमोजणी होत असून 25-25 चे गठे तयार करण्यात आले आहेत. साधारणता दोन तासात या निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.