नागपूर - शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम नगर परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धीरज राणे आणि सुषमा राणे असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. या शिवाय त्यांची दोन मूले देखील मृतावस्थेत आढळून आली आहेत. कोराडी पोलीस घटनास्थळी पोहचले असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे.
धीरज राणे हे शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होते. तर, त्यांची पत्नी नागपुरातील एका रुग्णालयात कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. आज (मंगळवार) दुपारी राणे दाम्पत्याने दोन्ही मुलांसह आत्महत्या केली. सुषमा राणे यांनी गळफास घेतला होता. तर, धीरज राणे आणि त्यांचा ११ वर्षीय मुलगा ध्रुव, ५ वर्षीय मुलगी वाण्या यांचे मृतदेह पलंगावर पडलेले आढळून आले आहेत.
हेही वाचा - दिशा व सुशांतचे आत्महत्येपूर्वीचे व्हॉट्सअॅप चॅट आले समोर
धीरज राणे आणि त्यांची पत्नी आज सकाळी उशिरापर्यंत झोपेतून उठले नाहीत, म्हणून त्यांच्या आईने आवाज दिला होता. त्यावेळी धीरज यांची पत्नी सुषमाने त्यांच्याशी संवाद साधला होता. मात्र, त्यानंतर दुपारी सुषमा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. सदर घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता त्या ठिकाणी एक सुसाईड नोट आढळली आहे.