नागपूर : नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. अश्विनी खंडागळे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होत्या. त्या गेल्या काही दिवसांपासून त्या मानसिक तणावात होत्या. ज्यामुळे त्या ड्युटीवर देखील गैरहजर होत्या. अश्विनी यांचे पती बीएसएफमध्ये बिहार येथे कार्यरत आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.
नवरात्रीपासून ड्युटीवर नव्हत्या
अश्विनी खंडागळे या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा फाटा परिसरात असलेल्या लक्ष्मी नारायण नगर येथे वास्तव्यास होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या मानसिक तणावात आल्याने त्या नवरात्रीपासून ड्युटीवर देखील गेलेल्या नव्हत्या. आत्महत्या करण्यापूर्वी त्या त्यांच्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला गेल्या होत्या. त्या अतिशय शांत आणि आनंदी राहणाऱ्या होत्या असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत काहीही माहिती कळू शकली नाही.
अश्विनी यांना दोन वर्षांची मुलगी
मृत अश्विनी खंडागळे यांना 2 वर्षांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुलीचा वाढदिवस थाटात साजरा केला होता. मुलीच्या भविष्याबाबत त्यांनी अनेक स्वप्न रंगवले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी घरातील प्रत्येका सोबत हसत खेळत संवाद साधला होता, असे निकटवर्तीयांनी म्हटले आहे. हुडकेश्वर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.