नागपूर- घरफोडी केल्यानंतर त्या घरातील कार चोरून दुसरी चोरी करण्याकरीता निघालेल्या दोन चोरट्यांना सीताबर्डी पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी आरोपीं जवळून 8 मोबाईल सेटसह दोन दुचाक्या आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. अजय उर्फ अज्जू वरखेडे आणि रोशन पाचे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
अजय आणि रोशन हे दोघेही सराईत चोरटे असून ते घरफोडीच्या गुन्ह्यात तरबेज आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अजय आणि रोशनच्या जोडीने शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. एवढेच नाही तर हे दोघेही दुचाकी चोरी करण्यातही पटाईत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध पोलीस ठाण्याचे पोलीस या दोघांच्या शोधात होते. मात्र, ते हाती लागत नसल्याने पोलिसांचे देखील प्रयत्न अपयशी ठरत होते.
रविवारी रात्री सीताबर्डी पोलीस ठाण्याचे एक पथक रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना एक कार संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली. पोलिसांनी त्या गाडीला थांबण्याचे आदेश दिल्यानंतर ती गाडी थांबण्याऐवजी पळून गेल्याने पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. पोलीस मागावर येत असल्याने आरोपी सैरावैरा पळत असताना त्यांची कार एका दुभाजकावर आदळली. तेवढ्यात सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने त्या गाडीत बसलेल्या रोशन पाचे नावाच्या आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घरफोडी केली असल्याची कबुली दिली. एवढंच नाही तर ती कार देखील त्याच घराच्या आवारातून चोरल्याची माहिती त्याने दिली.
पहिली घरफोडी यशस्वी झाल्यानंतर दुसरी घरफोडी करण्यासाठी निघालो होतो, असे देखील आरोपीने कबूल केले आहे. रोशन पाचे याच्या मदतीला अजय उर्फ अज्जू वरखेडे असल्याची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी अजयला देखील अटक करून त्यांनी चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या चोरीच्या मुद्दे मालामध्ये दोन दुचाकी, आठ मोबाईल, एक कार आणि लाखोंच्या दागिन्यांचा समावेश आहे. या दोन्ही चोरांनी पोलिसांच्या नाकीनव आणला होता. आता हे दोघेही अटक झाल्याने जुने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.