नागपूर - रामटेकचे शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहे. फेसबुक व ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती त्यांनी दिली. टर्किश सिक्युरिटी आर्मी नावाच्या सायबर हॅकरने त्यांचे अकाउंट हॅक केल्याचा संशय आहे. खासदार तुमाने यांनी नागपूर सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - वीज कनेक्शन तोडायला गेलेल्या वीज वितरण कर्मचाऱ्याला जबर मारहाण
संयुक्त राष्ट्रांत भारताच्या प्रतिनिधी स्नेहा दुबे यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानसह दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना सुनावले होते. भारताच्या या कन्येने भारताचे मत जगासमोर परखडपणे मांडले होते. त्या संदर्भातील एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर फेसबूकसह ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आल्याचे तुमाने म्हणाले.
पाकिस्तान भारतीय मुलींना घाबरतो
ट्विटर आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर या संदर्भात खासदार तुमाने यांनी नागपूर पोलिसांच्या सायबर सेलकडे रीतसर तक्रार दिली आहे. पोलिसांनी अकाउंट हॅक करणाऱ्याचा शोध घ्यावा, अशी मागणी तुमाने यांनी केली आहे. दरम्यान, पाकिस्तान भारतीय मुलींना किती घाबरतो, हेच या घटनेतून दिसून आल्याचे तुमाने म्हणाले.
हेही वाचा - राखा को पकड कर दिखा दो..., पोलिसांना चॅलेंज देणाऱ्या कुख्यात गुंडाला नागपुरात अटक