नागपूर - महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरूनच विनायक सावरकर यांनी इंग्रजांकडे दया याचिका दाखल केली होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा सावरकर या विषयाच्या अवतीभवती देशाचे राजकारण सुरू झाले आहे. उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या 'वीर सावरकर हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन' या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. हा दावा करताना त्यांनी कोणतेही तथ्य आणि पुरावे सादर केले नाहीत, त्यांचे वक्तव्य हे राजकीय दृष्टीने त्यांच्या सोयीचे असेल, असा दावा विनायक सावरकर यांच्यावर सखोल अभ्यास करणारे रामभाऊ तुपकरी यांनी केला आहे. इतिहासाचे विश्लेषण एखाद्या स्टेटमेंटच्या आधारे करणे शक्यच नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - भारताच्या विभाजनासाठी सावरकर जबाबदार - मुख्यमंत्री भूपेश बघेल
राजनाथ सिंह यांनी इतिहासाला रंगवताना केलेल्या वक्तव्याचा अर्थ आपण एखाद्या राजकीय व्यक्तीने केलेल्या वक्तव्याचा अर्थ जसा लावला जातो तसाच लावला, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. रामभाऊ तुपकरी हे अनेक दशकांपासून वीर सावरकर यांचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे मुळात या विषयाचा इतिहास काय आहे या संदर्भात अनेक मतप्रवाह असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इतिहासाला इंग्रजी भाषेत हिस स्टोरी म्हणजे हिस्ट्री असं म्हंटल जातं, दोन माणसांनी एका महापुरुषांच्या संदर्भात सादर केलेला दावा एकसारखा असेल याची सुतराम शक्यता नसल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे. त्याकाळी विनायक सावरकर यांनी हिंदूंना मिलिटरी जॉईन करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यावेळी देशात इंग्रजांचे शासन होते. तरी देखील सावरकरांनी असा सल्ला का दिला असेल या मागचा त्यांचा हेतू काय होता हे जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. ते असं या करिता म्हणाले होते की इंग्रजांच्या सैन्यात सर्वाधिक मुसलमान समाजातील लोकांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांनी हिंदूंना मिलिटरी जॉईन करून स्वतःला सशक्त करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, प्रत्येकाने त्यांच्या या आवाहनाचे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण केले.
- राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याला आधार नाही:-
विनायक सावरकर यांची मुळातच अशी ईच्छा होती की, अंदमान कारागृहात सडत राहण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी करावे म्हणून त्यांनी इंग्रजांना सांगितले होते की मला रत्नागिरी येथे परत पाठवा, नजरकैदेत ठेवा, हवं तर मी सक्रिय राजकारणात सहभागी होणार नाही. मात्र, महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून सावरकरांनी माफीनामा सादर केला. या वक्तव्यामागे कोणताही आधार किंवा पुरावा नसल्याचं रामभाऊ तुपकरी म्हणाले आहेत.
- वीर सावरकर शरणागती पत्करणाऱ्यांपैकी नव्हते :-
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन प्रवासावर सखोल अभ्यास करणारे रामभाऊ तुपकरी यांच्या मते, सावरकर शरणागती पत्करणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी कधीही अराष्ट्रीय विचार केला नाही. त्यांची प्रत्येक कृती राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनेच होती. त्यांनी मला कारागृहातून मुक्त करा असं म्हंटले असेल तर सर्वात आधी त्यांचा हेतू समजून घेण्याचा सल्ला विचारवंत रामभाऊ तुपकरी यांनी दिला आहे.
- इतिहास अभ्यासकांनी शोध घ्यावा -
राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा या विषयावरून वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावरकर यांच्यावर अभ्यास करणाऱ्यांनी राजनाथ सिंह यांनी केलेल्या दाव्याचा अभ्यास करावा, असा सल्ला रामभाऊ तुपकरी यांनी दिला आहे.
हेही वाचा - राजनाथ सिंह यांच्या 'त्या' वक्तव्याबाबत सुशीलकुमार शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...