नागपूर - मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गुपचूप पद्धतीने चरस पुरवणाऱ्या कर्मचाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी रंगेहात पकडण्यात आले होते. मंगेश सोळंकी असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बंदीवनांना चरस पुरवल्या प्रकरणी त्याच्यावर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झलयानंतर त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
चरस पुरवण्याच्या आरोपात अटक झालेल्या मंगेश सोळंकी २७ ग्राम चरस कारागृह घेऊन जात असताना अधीक्षकांनी त्याला रंगेहात पडकले होते. कारागृह कर्मचारी मंगेश आणि इतर चार सुरक्षा रक्षक कारागृहात कर्तव्यावर हजर होत असतानाकारागृह अधीक्षकांनी त्यांची झडती घेतली असता मंगेशच्या सॉक्स मध्ये दोन पुड्या सापडल्या होत्या,ज्यामध्ये चरस असल्याचे निष्पन्न झाले. कुणालाही संशय येऊ नये या करिता मंगेश ने चरस सॉक्स मध्ये लपवून ठेवले होते. चक्क कारागृहातील कर्मचारीच अमली पदार्थ बंदीवानांना पुरवत असल्याने कारागृह अधीक्षकांनी मंगेश सोळंकीला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर आता त्याला निलंबित करण्यात आले आहे.
तीन हजारात झाली डील -
नागपूर मध्यवर्ती कारागृहात गोपी नावाचा एक गुंड बंद आहे,त्याला चरसचे व्यसन असल्याने त्याने मंगेशशी संपर्क साधला. बाहेरून चरस आतमध्ये आणण्यासाठी तीन हजार रुपयांमध्ये सौदा पक्का झाला होता. मात्र, कारागृह अधीक्षकांना गेल्या काही दिवसांपासून मंगेश वर संशय वाढला होता. यातूनच त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ २७ ग्राम चरस आढळून आल्याने कारागृहाच्या अंतरिम सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.