नागपूर - उकाड्य़ाने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र आज नागपूरकरांना सुखद धक्का बसला आहे. नागपूर परिसरात तब्बल पाऊण तास वरुणराजा बरसला. त्यामुळे ४६ अंश तापमानाच्या उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाने अखेर एन्ट्री घेतली आहे.
चातकासारखी वाट बघत असलेल्या बळीराजाला वरुणराजाने आज सायंकाळी सुखद धक्का दिला. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला पावसाने ओलेचिंब करीत वातावरणात गारवा निर्माण केला. या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी अजून दमदार पावसाची गरज आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कडकडीत ऊन पडत होते. घामाच्या धारांनी बेजार झालेल्या शहरवासीयांना अचानकपणे आलेल्या पावसाने सुखद दिलासा मिळाला. जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी बरसल्या. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक पावसाच्या आगमनासाठी आतूर झाले होते. काही विद्यार्थ्यांनी पहिल्याच पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. भाजीपाला विक्रेत्यांसह इतर लहान व्यापाऱ्यांचेही या पावसाने हाल झाले. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्य जनतेला आडोशाचा आधार घ्यावा लागला.