नागपूर - गॅस सिलेंडर भाव वाढल्याच्या विरोधात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या संविधान चौकात एक अनोखे आंदोलन केले. गॅस सिलेंडरचे दर अचानक वाढल्याने या आंदोलक महिलांनी चक्क चुलीवर भाकरी केल्या. या वेळी, त्यांनी सिलेंडर आता सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याबाहेर जात असल्याने सिलेंडर बाजूला सारून चक्क चुलीला प्राधान्य देत आपल्या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारची उज्ज्वला योजना फसवी असल्याचा आरोप केला आहे.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरचे दर अचानकपणे अन्यायकारकरित्या वाढवल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडले आहे. एकीकडे कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात काम-धंदे बंद पडले आहेत. तर अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असताना केंद्र सरकारने दिलासा देण्याऐवजी पेट्रोल-डिझेलसह सिलेंडरचे दर वाढवून एका प्रकारे गोरगरिबांवर अन्याय केल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या महिलांनी केला आहे.
हेही वाचा - कोरोनाकाळात १,३२९ कोटींचा खर्च, आणखी ४०० कोटींची तरतूद
सिलेंडर बाजूला सारून चुलीवर केल्या भाकरी
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आंदोलनकर्त्या महिलांनी चक्क संविधान चौकातील आंदोलनस्थळीच स्वयंपाक खोली तयार करून चुलीवर भाकरी केल्या. या वेळी चुलीच्या शेजारी सिलेंडर देखील ठेवण्यात आले होते. घरी सिलेंडर असताना देखील ते परवडणारे नसल्याने अनेक गृहिणी चुलीवर स्वयंपाक करत असल्याचे चित्र आंदोलन करणाऱ्या महिलांनी उभे केले.
उज्ज्वला योजना फसवी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून गोरगरिबांच्या स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर पोहचावे, याकरिता उज्ज्वला गॅस योजना राबविली. मात्र, ज्या पद्धतीने संकटाच्या काळात या सरकारे सिलेंडरचे दर वाढवून सर्वसामान्य जनतेची चेष्टा केली आहे, ते बघता केंद्राची उज्ज्वला योजना ही फसवी ठरल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे
हेही वाचा - मुंबईचा महापौर काँग्रेसचाच होईल, भाई जगतापांना विश्वास