नागपूर - शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर स्कुल व्हॅनला रुग्णवाहिकेत परिवर्तीत करा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदिप जोशी यांनी केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन म्हणून मनपाच्या प्रादेशिक परिवहन विभागाला पत्राव्दारे हे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय यातून स्कुल व्हॅन चालकांनाही रोजगार मिळेल, असेही महापौरांनी सांगितले.
सर्वत्र सध्या कोरोना फोफावत आहे. अनेक शहरांमध्ये आरोग्य विषयक सोयी सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून त्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी रुग्णवाहिके अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्याकडून स्कुल व्हॅनला रुग्णवाहिकेत रूपांतरीत करा, अशा आशयाचे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात आले आहे. शहरातील भविष्याची परिस्थिती पाहता गैरसोय होवू नये म्हणून ही व्यवस्था करण्यात यावी असे आवाहनही जोशी यांनी केले आहे. शिवाय अनेक दिवसांपासून शाळा बंदच आहेत त्यामुळे स्कुल व्हॅन देखील बंद अवस्थेत आहेत. यात किरकोळ बदल करुन रुग्णवाहिकेत रुपांतर केले तर महानगरपालिकेला मोठी मदत होईल, असेही संदिप जोशी यांनी सांगितले.
यासोबतच स्कुल व्हॅनला रुग्णवाहिकेत रूपांतरित केल्यास चालकांनाही यातून रोजगार मिळेल असे मत महापौरांनी व्यक्ते केले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाला पत्राव्दारे हे आवाहन महापौरांनी केले. शहरात रुग्णवाहिकेची कमतरता दूर करण्यास व एक सक्षम यंत्रणा उभे करण्यास सहकार्य करा, अशी विनंतीही या पत्राव्दारे महापौरांनी केली आहे. शिवाय महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकेत अधिक भर पडेल आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही, असेही महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता वेळीच पावले उचलून महानगरपालिकेला सहकार्य करा, त्याचबरोबर या लढ्यात सर्वांनी मिळून योगदान द्या, असे आवाहनही जोशी यांनी केले आहे.
दरम्यान, असे असले तरी शहरातील वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. यात प्रशासनाच्या कार्यशैलीवरही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. त्यामुळे फक्त रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने मृत्यूदर थांबेल का? अशी चर्चाही पहायाला मिळत आहे. म्हणूनच महानगरपालिका आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज असल्याचेही बोलल्या जात आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राजकीय खलबते; कंगना संदर्भात सावध भूमिका घेण्याची पवारांची सूचना