नागपूर - टाळेबंदीच्या नियमात शिथिलता लागू केल्यापासून अनेक महानगरांमध्ये बस सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, नागपुरात शहर बस सेवा अजूनही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे सांगत महापालिकेच्या परिवहन समितीने शहरात बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
परिवहन समितीचे सभापती नरेंद्र बोरकर यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवून बस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.
परिवहन समितीचे सभापती नरेंद्र बोरकर म्हणाले की, बसमध्ये नियमांचे पालन करण्यात येणार आहे. क्षमतेच्या पन्नास टक्केच प्रवासी बसमधून प्रवास करू शकणार आहेत. तशी आसन व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. महापालिकेची बस प्रवाशांसाठी सज्ज झाली आहे. महापालिकेतर्फे नागपूर शहरात 'आपली बस' नावाने सार्वजनिक परिवहन सेवा देण्यात येते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून शहर बस सेवा बंद करण्यात आली आहे.
करड्या शिस्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मुंढे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत. त्यामुळेे आयुक्त मुंढेंबाबत लोकप्रतिनिधींंकडून नाराजी व्यक्त करण्यात करण्यात आली होती.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे बस सेवेबाबत कधी निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.