नागपूर - कोरोना संक्रमणाचे कारण देत मुंबई येथे १९९८ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन कैद्यांनी आपत्कालीन पॅरोलसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र या कैद्यांनी केलेले गुन्हे आणि त्यांचा पूर्वीचा रेकॉर्ड बघता न्यायालयाने त्यांची याचिका गुणवत्ताहीन ठरवत पॅरोल नाकारला आहे. आरोपी आपत्कालीन पॅरोलसाठी पात्र नासल्याचे निरीक्षण देखील नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. असगर कादर शेख आणि मो याकूब अब्दुल मजीद नागुल अशी या दोन कैद्यांची नावे आहेत.
१९९८ साली राज्याची राजधानी मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी असगर कादर शेख आणि मोहम्मद याकूब नागुल हे नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी तातडीची अभिवचन रजा (पॅरोल) मिळावी म्हणून गेल्यावर्षीसुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अर्ज दाखल केला होता. मात्र आरोपींवर असलेल्या गुन्ह्यांचे स्वरूप बघता कारागृह प्रशासनानेच त्यांचा अर्ज फेटाळला होता, या विरोधात असगर कादर शेख आणि मोहम्मद याकूब नगुल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल केली. यावर मंगळवारी सुनावणी झाली असता, न्यायालयाने दोन्ही कैद्यांची याचिका गुणवत्ताहीन ठरवत पॅरोल देण्यास नकार दिला आहे.
२००६ मध्ये झालेल्या कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू-
२००६ साली मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीचा २० एप्रिल २०२१ ला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कमाल अनसारीने २००६ साली मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्याने मुंबई न्यायालयाने त्याला २०१५ साली फाशीची शिक्षा सुनावली होती. काही काळ मुंबईत राहिल्यानंतर त्याची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. एप्रिल महिन्याच्या १० तारखेच्या दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली होती, त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेडिकल) येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.