नागपूर - तिन्ही पक्षांचे नेते दिवसभर माध्यमांत येतात. केंद्रावर टीका करतात आणि प्रत्यक्षात मात्र कोरोना स्थिती हाताळण्यासाठी काहीही करीत नाही. केंद्राने काल रेमडेसिवीरची काळाबाजारी रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलली. ऑक्सिजन बेड्सच्या आधारावर रेमडेसिवीरचा कोटा दिला गेला, तो महाराष्ट्राला सर्वाधिक आहे. यावर महाविकास आघाडीचे नेते केवळ टीका करण्याचेच काम करत असून कोरोनाच्या परिस्थितीवर काम करण्यासाठी काहीही करत नसल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते नागपुरात बोलत होते.
सत्तेतील मंत्र्यांना केवळ एकच काम आहे. रोज माध्यमांत यायचे आणि मनात येईल ती आकडेवारी सांगायची. म्हणूनच प्रत्येकाची आकडेवारीही वेगळी असते. ऑक्सिजन देण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस आज महाराष्ट्रात पोहोचते आहे. सर्वाधिक ऑक्सिजनसुद्धा महाराष्ट्राला मिळत आहे, असेही फडणविसांनी सांगितले.
नागपूरातील चाचण्यांचे आकडे समाधानकारक, मुंबईत चाचण्या वाढवण्याची गरज -
राज्यात चाचण्यांवर भर देण्याची नितांत गरज आहे. नागपुरात अधिक टेस्टिंग होते, ही समाधानाची बाब आहे. सरासरी 30 हजार चाचण्या नागपुरात होत आहेत. पण, मुंबईत एवढी मोठी लोकसंख्या असताना केवळ सरासरी 40 ते 45 हजार चाचण्या होत आहेत. संसर्ग रोखायचा असेल तर चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.