नागपूर - लोकसभा निवडणुका होण्यास तीन वर्ष बाकी आहे. त्यामुळे तीन वर्ष बाकी असताना कोण कोणासोबत निवडणूक लढवणार यावर भाष्य करणे, हे शहाणपण नाही असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले. ते नागपुरात विमानतळावर आयोजित नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या सत्कार प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी शिवसेना युती झाल्यास चमत्कार घडेल, असे संजय राऊत म्हणाले त्यावर भाष्य करताना पटेल म्हणाले, की हे मी आजच्या 'सामना'त वाचले आहे. तर, यावर आधीच काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी यासंदर्भात पक्षाकडून स्पष्टीकण दिलेलं आहे, की निवडणुकी संदर्भातला निर्णय हा 2023 नंतर घेतला जाईल. यामुळे यावर काही आताच बोलता येणार नाही.
नाना पटोले मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे, या संदर्भात बोलतांना पटेल म्हणाले की लोकशाहीत कोणी पण मुख्यमंत्री होऊ शकते. ज्या पक्षाला बहुमत असेल त्या पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करावे, हा त्यांचा निर्णय असतो. त्यामुळे या विषयावर मी काही बोलणे योग्य नाही. सद्यस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघडीला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्रीपदाची जागा रिकामी नाही असे म्हणत त्यांनी पटोलेंना चिमटा काढला.
स्थानिक स्वराज्य संस्था बद्दल युती संदर्भात बोलताना पटेल म्हणाले, की यावर आताच बोलता येणं योग्य नाही. अद्याप कोणत्याची निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. शिवाय निवडणुकांसदर्भातील काही विषय हे स्थानिक पातळीवर ठरतात. कोविडमुळे तशाही निवडणुका थांबलेल्या आहे. दुसरे ओबीसी अरक्षणाच्या विषयावर राज्यसरकारने रिव्ह्यु पिटीशन दाखल करणार आहे. यामुळे याचा निकाल येईपर्यंत काही बोलता येणार नाही.