नागपूर - कोरोना संकटामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कृषी क्षेत्रासाठी अडचणीत येण्याची शक्यता राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर वाढलेल्या खतांच्या किंमती आणि पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार गेल्याने याचा विपरीत परिणाम शेतकऱ्यांवर झालेला आहे. भविष्यात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता लक्षात घेता केंद्राने खतांचे वाढलेले दर मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. नागपुरात आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
'शेतकरी वर्ग हवालदिल'
गेल्यावर्षी सुरू झालेल्या कोरोनाचे जीवघेणे संकट याही वर्षी कायम आहे. किंबहुना यंदाच्या वर्षी कोरोनाची दाहकता आणखी तीव्र झालेली आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांकडे काही बचतीची पैसे शिल्लक होते, सोबत राज्य सरकारने देखील कर्जमाफी दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मागच्या वर्षी कसेबसे चांगले गेले. मात्र यावर्षी तशी परिस्थिती नाही. कोरोना महामारीमुळे चहूबाजूने आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोर खरीपाची पेरणी कशी करायची असे संकट असताना आता केंद्र सरकारने खतांच्या किमतींमध्ये तब्बल २५ टक्यांपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे ते म्हणाले आहेत. खतांच्या किंमती ठरवण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे आहे. त्यामुळे वाढलेल्या खताच्या किंमती कमी करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
...म्हणून वर्ध्यात कडक लॉकडाऊन
वर्ध्याशेजारी असलेल्या अमरावती जिल्ह्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून मोठा धोका आल्याची चर्चा आहे. हा धोका वर्ध्यातदेखील उद्धभू शकतो, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र आता नियमात शिथिलता देण्यात आली असल्याचे ते म्हणाले आहेत.