नागपूर - महाविकास आघाडी ही गव्हर्नससाठी झाली नसून सत्तेचे लचके तोडण्यासाठी झाल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. प्रत्येक जण हा सत्तेचे लचके तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. ते जमले नाही तर आपसातच लचके तोडण्याचे त्यांचे काम सुरू असल्याचाही टोला फडणवीस यांनी लगावला आहे. राजेंद्र शिंगणे यांनी यांनी आपलं सरकार असले तरी रस्त्यावर उतरुन आंदोलने करा, निदर्शनं करा, असा अजब सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यावरून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.
अनिल देशमुख यांनी ईडीच्या चौकशीला समोर जावे....
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने लूक आऊट नोटीस काढली आहे. देशमुख यांचा आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा प्रवास झाला आहे. त्यामुळे आता त्यांनी कायद्याच्या दृष्टीने ईडीच्या चौकशीला सामोरे जावे तेच योग्य होईल, असे सल्ला फडणवीस यांनी यावेळी अनिल देशमुख यांना दिला आहे.
करुणा शर्मा प्रकरणात कोणताही दबावा शिवाय चौकशी झाली पाहिजे-
करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल आढळून आलेल्या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, की हा प्रकार गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि बोलन्यापासून कोणाला वंचित ठेवता येणार नाही. पण जिथे ती घटना घडली आहे, त्यातून कायदा आणि सुव्यवस्था कशा स्वरूपात सांभाळली जात आहे, हेच स्पष्ट होत आहे. करुणा शर्मा यांची चौकशी झाली पाहिजे पिस्तुल मिळणे आणि तो ठेवल्याचा व्हिडिओ सर्व गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी कोणाच्याही दबावाशिवाय व्हायला हवी असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री यांनी पक्षातील लोकांना शिकवावे मग आम्हाला बोलावे....
मुख्यमंत्री यांनी भाजपा आंदोलन करून राजकारण करत असल्याची टीका केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर बोलण्या ऐवजी पहिल्यांदा सोबतच्या पक्षांना शिकवावे मग आम्हाला बोलावे, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.