नागपूर/ वर्धा - अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला झोडपले आहे. यात गहू, हरभरा, संत्रा आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. या भागांत पुढील २४ तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भंडाऱ्यात ही गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. तर वर्ध्यात विज कोसळून दोघांचा मृत्यू झाला.
नागपूर जिह्यातील मौदा, पारशिवणी, सावनेर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात गहू, हरभरा, संत्रा आणि आंबा पिकांना फटका बसला आहे. या भागात २४ तासांमध्ये आणखी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिट झाली. यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गिरड, वायगाव परिसरातील धामणगाव, खुर्सापार, रामनगर, परसोडी, निरगुडी, कांढळी, कुर्ला, उमरी आदी गावांना गारपिटीचा फटका बसला. गहू, हरभरा, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गिरीधर यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या बैलाचा झाड कोसळल्याने मृत्यू झाला. परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले आहे.
विज पडून सेलू तालुक्यातल्या धपकी गावातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.बकरी चराईसाठी गेले असताना ही घटना घडल्याचे समोर आले. यात १४ वर्षीय देवानंद सहारे आणि ४७ वर्षीय सत्तार शेख या दोघांचा मृत्यू झाला.