नागपूर - पुन्हा एकदा नागपूर शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येचा उद्रेक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या वर्षतील सर्वाधिक रुग्ण संख्येची नोंद बुधवारी झाली आहे. दिवसभरात उपराजधानी नागपुरात तब्बल ११५२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १५२८१२ वर पोहोचली आहे. आजच्या ११५२ कोरोनाबाधितांपैकी २५२ रुग्ण हे नागपूर ग्रामीणमधील आहेत. तर ८९७ रुग्ण हे शहरातील आहेत. आज ६९५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपूरात आज ११७५० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये ८४९४ आरटीपीसीआर तर ३२५६ अँटिजेन चाचण्यांचा समावेश आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भातच कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याने, रुग्ण संख्या देखील वाढत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
पूर्व विदर्भातील कोरोनाबाधितांची संख्या
आज पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये एकूण 3058 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. नागपुरात आज ११५२ रुग्णांची नोंद झाली आहे, तर वर्धा जिल्ह्यात १०६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ५४ तर भंडारा येथे २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय गडचिरोली जिल्ह्यात १० तर गोंदिया जिल्ह्यात २५ कोरोनाबाधितांची नोंद झाली.