नागपूर - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीत येत असतात. पण कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमामुळे यंदाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची महिती डॉ. बाबासाहेब स्मारक समितीचे सचिव डॉ. फुलझले यांनी दिली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिल्याने त्या दिवसाच्या औचित्यावर जवळपास 20 लाख अनुयायी अभिवादन करतात. पण कोरोनाच्या नियमाचे पालन आणि प्रशासनाने विशेष तय्यारी केली आहे. या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी सामूहिक सोहळानिमित्त सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पण तरी बौद्ध स्तुपाचे दर्शन घेता येणार आहे. पण हे दर्शन घेताना 18 वर्षावरील आणि 65 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना दर्शनासाठी जाता येणार आहे. त्यासाठी ओळखपत्र ठेवणेही बंधनकारक केले आहे. दरवर्षी चार ते पाच रांगेतून लोकांना सोडण्याचे नियोजन असते. पण यंदा एकच रांग असल्यानें दीक्षाभूमी स्मारक समितीला सहकार्य करण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेतुन करण्यात आले आहे. यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांनी शक्यतोवर 14 आणि 15 ऑक्टोबरला येण्याचे टाळून त्यांनतर आल्यास त्यांना अधिक सुरक्षित आणि योग्य पध्दतीने दर्शन घेण्यासाठी सोयीस्कर होईल असेही आवाहन स्मारक समितीकडून करण्यात आले आहे.
हे ही वाचा -दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा रद्द, जिल्हा प्रशासनाचा निर्णय
स्मारक समितीवर मान्यवरांची निवड -
दीक्षाभूमी स्मारक समितीवर सामाजिक क्षेत्रात नावलौकिक असलेले डॉ. कमलताई गवई, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे आणि भंते नागदिपांकर या चार नवीन सदस्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीवर निवड करण्यात आली असून त्यांनी ती स्वीकारली असल्याचीही माहिती डॉ. सुनील फुलझले यांनी अधिकृतरित्या दिली.
मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी मंजूर केलेले 100 कोटी अजून मिळाले नाहीत -
दीक्षाभूमीचा सगळा खर्च दानातून चालतो. कोरोनामुळे दानातून मिळणाऱ्या मदतीमध्ये तूट झाली आहे. यामुळे दानदात्यांनी मदत करावी, असे आवाहन सुद्धा स्मारक समितीकडून करण्यात आले आहे. यासोबत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेवटच्या टप्प्यात दीक्षाभूमीला 100 कोटींचा निधी जाहीर केला होता. यात सोशल वेल्फेअर विभागामार्फत 40 कोटींचा निधी नोडल एजन्सी असलेल्या एनआयटी संस्थेला देण्यात आले. पण मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीला प्रशासकीय मान्यता न मिळल्याने ते पैसे खर्च करू शकले नाही. वेळोवेळी प्रयत्न करून त्यात अडचणी निर्माण करण्यात आल्याचे म्हणत नाराजी सुद्धा व्यक्त केली. तसेच आतापर्यंत कुठलाही निधी यापूर्वी दीक्षाभूमीला मिळाला नसून तो त्या संबंधित एजन्सीला मिळतो आणि तेच त्यातून कामे करत असतात, अशी माहिती डॉ. सुनील फुलझले यांनी पत्रकार परिषदेत दिली.