नागपूर - देशातील शेतकरी वर्ग खुश आहे. मात्र केवळ पंजाब येथील शेतकरीच आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा बोलवता धनी आणखी दुसरे असल्याची टीका श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी केली. ते माध्यमांशी बोलत होते.
अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या बांधकामाला येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीकडून निधी समर्पण गृह संपर्क अभियान राबवले जाणार आहे. हे अभियान १५ जानेवारीला सुरू होणार आहे. हे अभियान २७ फेब्रुवारीपर्यंत चालविले जाणार असल्याची माहिती समितीचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली आहे. त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
शेतकरी आंदोलनामागे खलिस्तानवादी असल्याचा आरोप
गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, माझ्या दृष्टीने हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही. ते देशातील फुटीरतावादी लोकांनी निर्माण केलेले आंदोलन आहे. त्यात शेतकऱ्यांना पुढे ठेवलेले आहे. कृषी कायद्यामुळे जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असते तर देशात आंदोलनाची आग पेटली असती. मात्र, वास्तविक देशातील शेतकरी खुश आहेत. पंजाब राज्यातील शेतकरी आंदोलनामागे खलिस्तानवादी, पाकिस्तानसह तुकडे तुकडे गॅंग, लुटीयन पक्षाचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे
हेही वाचा-पंढरपूर पोटनिवडणूक : पार्थ पवारांच्या नावाची चर्चा, भगीरथ भालकेंच्या नावाचाही आग्रह
श्रीराम मंदिराचे निर्माण कसे असेल यावर उद्या निर्णय-
अयोध्या येथे राम मंदिर निर्माण कार्य सुरू होण्यापूर्वी काही तांत्रिक अडचणी समोर आल्या आहेत. मंदिराचा पाया खोदताना आतील जमीन भुसभुशीत असल्याने यावर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींनी अध्ययन केल्यानंतर काही बदल सुचवले आहेत. त्यावर उद्या दिल्ली येथे आयोजित बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली आहे. आतील भूभाग भुसभुशीत असल्याने सिमेंट पीलर ऐवजी दगडांच्या मदतीने श्रीरामाचे मंदिर निर्माण केले जाणार आहे. या निर्माण कार्याला सुमारे साडेतीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यासाठी अंदाजित अकराशे कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्या करिता २७ फेब्रुवारीपर्यंत अभियान चालविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीसांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; २०२१ या नव्या वर्षासाठी घातले साकडे
जगातील रामभक्तांसाठी सेतुबंध
सुमारे साडेतीन वर्षांनंतर राम मंदिर तयार होणार अशी शक्यता आहे. त्यानंतर जगात रामाचे भक्त लाखोंचा संख्येने आहेत. त्याचबरोबर नवे रामभक्त निर्माण करण्यासाठी सेतूबंध कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली.