नागपूर - सोमवारी रात्री लडाखच्या गलवान प्रांतात भारत आणि चिनी लष्करात संघर्ष झाला. यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या. सीमेवर वाढलेला तणाव आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र ही परिस्थिती येणाऱ्या काळात युद्धासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता निवृत्त एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी फेटाळून लावली आहे.
दोन्ही देश सध्या कोविड -१९ या शत्रूंशी लढा देत असल्याने हे युद्ध कोणालाही परवडणारे नसल्याचे ते म्हणाले. मागील दोन महिन्यांपासून सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र चीनचे लष्कर भारतीय सीमेत आल्यानंतर तणाव आणखीच वाढला होता.
6 जून रोजी भारत आणि चीनच्या अधिकारी स्तरावर झालेल्या बैठकीत चीनचे लष्कर पाच किलोमीटर मागे जाईल, असे ठरले होते. मात्र चीनच्या लष्कराने पुन्हा पुढे येऊन दगड फेक केली; आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याने दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संघर्ष पेटल्याचे निवृत्त एअर व्हाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी सांगितले. सध्या परिस्थिती गंभीर वाटत असली तरीही हे प्रकरण ठराविक प्रांतापुरते मर्यादित असल्याचे ते म्हणाले. या घटनेनंतर लष्करी आधिकऱ्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. त्यामळे दोन्ही देश शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवून परिस्थिती सामान्य करतील असा विश्वास चाफेकर यांनी व्यक्त केलाय.