नागपूर - उपराजधानी नागपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर पोलीस विभागाकडून कडक निर्बंध लावण्यात आल्याची माहिती शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. धुलीवंदनाच्या दिवशी घराबाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी धुळवड साजरी करताना कुणीही आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
नागपूर शहरात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सोमवारी साजरी होणाऱ्या धुळवडीच्या पार्श्वभूमीवर आज नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांसह पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्तांच्या समवेत एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. यामध्ये शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, यामध्ये धुळवडीच्या दिवशी रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या नागिरिकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
६० ठिकाणी बंदोबस्त असणार -
धुलीवंदनाच्या दिवशी नागपूर शहरात हिंसक घडामोडी घडत असल्याचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर शहरात ६० ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. सोबतच शहरात अनेक ठिकाणी 'फिक्स पॉईंट' देखील तयार करण्यात आले आहेत. याशिवाय संवेदनशील भागात रूटमार्च करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सार्वजनिक ठिकाणी होळी खेळता येणार नाही -
कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता शहरात कुठेही सार्वजनिक ठिकाणी होळी खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. सोसायटीमध्ये देखील दोन परिवारांमध्ये होळी खेळताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकीवर होळीच्या दिवशी केवळ एकाच व्यक्तीला प्रवास करता येईल तर कारमधून केवळ दोघांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.