नागपूर - उत्तर भारतीयांसह अनेक राज्यातील लोक महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत. त्यांना आरक्षण देण्याबाबत प्रस्ताव आयोगाकडे पाठविणार आहोत. त्यावर अभ्यास करून सगळी माहिती घेऊन निर्णय घेता येईल, अशी माहिती राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते नागपुरात निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात या भागातून महाराष्ट्रात लोक स्थायिक झाले आहेत. जे लोक अनेक वर्षे महाराष्ट्रात राहत आहेत, ज्यांचे जन्म महाराष्ट्रात झाले आहे, अशांना आरक्षण देण्याचा विचार केला जात आहे. ही संख्या फार मोठी नाही. अनेक उत्तर भारतीय असे आहेत ज्यांना त्यांच्या राज्यात ओबीसींना आरक्षण आहे. मात्र महाराष्ट्रात आडनावात फरक आहेत. आयोगाला प्रस्ताव पाठवून आयोगाने त्यावर अभ्यास करावा. ती संख्या किती आहे, हे सगळे तपासून त्यावर विचार करू, असेही मंत्री वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा-पी.चिदंबरम आज गोवा दौऱ्यावर; तर मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाहांची भेट
ओबीसींचा तिढा सुटल्याशिवाय निवडणुका होणार नाही, यावर सर्वांचे एकमत....
ओबीसी आरक्षणासंदर्भात हा तिढा सुटल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, ही भूमिका सर्वांनी मांडली आहे. यामुळे तोपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर, या निवडणुका पुढे कशा ढकलता येईल यावरही विचार झाला आहे. सर्वांचे त्यावर एकमत झाले आहे. ओबीसी आरक्षण संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत तातडीने इंपेरिकल डाटा गोळा करण्याचा संदर्भात चर्चा झाली आहे. इतर राज्यांनी त्या संदर्भात काय पावले उचलली आहेत. याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
हेही वाचा-OBC Reservation : राज्य सरकार तयार करणार इंपिरिकल डेटा; सर्वपक्षीय बैठकीत एकमत
"तो तर अज्ञानी बालक...!"
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री यांना ओबीसी समिती हरविली असल्याचे पत्र लिहिले आहे. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी पडळकर यांच्यावर खोचक टीका केली. ते म्हणाले गोपीचंद पडळकर हा अज्ञानी बालक आहे. नुकतेच उगवलेले गवत आहे. त्याला स्वतःचे मुळ काय हे माहीत नसल्याने शोधत आहे. त्याला ओबीसी आरक्षण आणि त्या संदर्भातल्या उपसमिती संदर्भात विषय काय कळतो? कमिटीचा अहवाल आला आहे. यावर मख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. कॅबिनेट पुढे ठेवून निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या संदर्भातील अंतिम अहवाल हा पुढल्या बैठकीत येणार आहे. काही तरी क्रेडिट घेण्यासाठी पडळकर बोलले. त्यांच्या जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण कमी झालेले नाही. याची झळ आमच्या जिल्ह्यांमधील ओबीसींना बसली आहे.
हेही वाचा-एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासात मुभा
निर्णय घेताना मुख्यमंत्री सावधपणे पाऊले टाकतात-
कोरोनाची तिसरी लाट येईल याबद्दल मुख्यमंत्री वारंवार सावध करत होते. मात्र, तरीही काही भाजपचे लोक मंदिर उघडण्याची मागणी करत आहे. त्यांनी शाळा उघडण्याची मागणी करावी. तिसरी लाट केव्हा येईल, हे कुणालाच माहीत नाही. मात्र, गर्दी टाळणे हे गरजेचे आहे. पण मुख्यमंत्री अगदी सावधपणे पाऊल टाकत आहे. केरळव महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहे. गर्दी टाळणे हाच उपाय आहे. आता काळजी घेतली नाही तर निर्बंधाना पुन्हा समोर जावे लागेल. तिसरी लाट आली तर शाळा सुरू करण्याचा निर्णय आणखी पुढे ढकलावा लागेल.
महाज्योतिच्या माध्यमातून 72 नाविम हॉस्टेल सुरू करणार ...
महाज्योतिला कायमस्वरूपी संचालक मिळाले आहेत. यापूर्वीपेक्षा या कामाला अधिक गती मिळेल. महाज्योतिच्या माध्यमातून शासकीय इमारतीत हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असे त्यांनी जाहीर केले आहे.