नागपूर - महाराष्ट्रात फडणवीस सरकारने केलेल्या चुका यापुढे जनेतपुढे मांडणार असल्याचे सांगत काँग्रसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. यापुढे भाजपाच्या सत्तेत जनतेचा झालेला भ्रमनिरास दूर करणार आहे. तसचे जनतेच्या मदतीनेच सध्या चौथ्या स्थानावर घसरलेल्या काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनवण्याचा निर्धार पटोले यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार हे मोघलांप्रमाणे वागत असल्याची टीकाही केली.
नाना पटोले प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रथमच नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी 'मिट द प्रेस' मध्ये भाजपावर निशाणा साधत आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली. सध्या केंद्र सरकाच्या नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर बोलताना पटोले पुढे म्हणाले की, केंद्राचे हे तिन्ही शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत, आणि हेच जनतेला सांगण्यासाठी काँग्रेस मोठे आंदोलन उभारणार आहे. त्या दृष्टीने नियोजनही झाले असल्याची माहिती पटोले यांनी दिली.
पंतप्रधानांना देशात फक्त दोनच गरीब दिसले-
संसदेत पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर झाल्याचा प्रकार घडला, त्यावर त्यांचे हे अश्रू खोटे आणि नाटकी असल्याची टीका पटोले यांनी केली आहे. पहिल्यांदा 2014 मध्ये सभागृहात जाताना पंतप्रधान मोदी यांनी पायऱ्यांवर डोके ठेवले होते. त्यावेळी भावूक होत ते म्हणाले होते, की माझे सरकार गरीब शेतकऱ्यांसाठी काम करेल. देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर गरीब आहे. मात्र, पंतप्रधान मोदींना फक्त अदानी आणि अंबानी हे दोनच गरीब दिसले. बाकींच्या गरिबांकडे त्यांची नजर जात नसल्याचे चित्र सर्व देशाने पाहिले असल्याचा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.
अडवाणी साहेब काय बोलले हा सांगण्याच्या विषय नाही-
गुलाम नबी आजाद यांना निरोप देताना पंतप्रधान भावनिक झाले होते. मात्र, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीजींच्या वेळी, मुरली मनोहर जोशींच्यावेळी ते का भावूक झाले नाहीत? असा रोखठोक सवाल पटोले यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच अडवाणी साहेबांनी मला काय सांगितले हे सांगण्याचा विषय नसल्याचे म्हणत भाजपामधील अंतर्गत मतभेदाकडेही लक्ष वेधले. याच बरोबर 26 जानेवारीला दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न झाले. या सर्व प्रकारानंतर राकेश टिकैत यांच्या डोळ्यात आलेले अश्रू सर्व देशाने पाहिले. मात्र, 'गोदी मित्रांनी' त्यांच चेष्टा केली. मग आता पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले की, ते भावूक झाले असा शब्द प्रयोग केला जात असल्याचे म्हणत भाजपाच्या दुटप्पी पणावर पटोले यांनी बोट ठेवले.
लवकर निर्णय घेणार नसतील तर कोर्टात जावू-
राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ सद्स्यांची निवड अद्याप झाली नाही. राज्यपाल यांना 12 जणांच्या नावाची लिस्ट देऊन अनेक उलटून गेले. मात्र, त्यावर निर्णय घ्यायला ते अजून किती निर्णय घेणार आहेत हे कळत नाही. या प्रकरणात जर मोदी आणि अमित शाह हे दबाव आणणार असतील तर आम्ही न्यायालयात जाऊ असेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवीन चेहऱ्यांना संधी-
काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम यापुढील काळात केले जाईल. प्रत्येक नेते कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करणार आहेत. यासाठी नव्या जोशाने काम करण्याच्या दृष्टीने पक्षांची बांधणी केली जाईल, या पार्श्वभूमीवर पक्षात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचेही पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या गटबाजीवरून भाजपावर निशाणा-
काँग्रेस पक्षात गटा तटाचे राजकारण आहे, अशी टीका केली जाते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत अभिजित वंजारी यांना मिळालेला विजय काँग्रेसमध्ये गटबाजी नसल्याचे उत्तर असल्याचेही पटोले म्हणाले.
कलाकारांच्या ट्विटवर चौकशीची मागणी-
सुनील शेट्टी हे सुद्धा नटसाम्राट पेक्षा कमी नाही. त्यांनीही ट्विट केले. पण ते टॅग मात्र भाजपच्या बड्या नेत्याला केले. यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून खराब झालेली मोदींच प्रतिमा सुधारण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. त्यांनी केले असेल स्वतःहून पण आमची शंका असल्याने गृहमंत्र्यांना यावर चौकशीची मागणी केली आहे. यासाठी भाजपने बेंबीच्या देठापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओरडण्याची गरज काय? असा सवाल केला. यात सोशल मीडियात कोणी काय पाप केले याची चौकशी होऊ द्या.