नागपूर - महाविकास आघाडी ओबीसी समाजच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. या विषयावरून ते सातत्याने महाविकास आघाडीवर आरोपांची सरबत्ती करत आहेत. मात्र, आता काँग्रेस पक्षातील नेत्यांकडूनही अप्रत्यक्षपणे ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी केला असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले आहेत. या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते बबनराव तायवाडे यांनीही सरकारवर ओबीसींच्या मागण्या संदर्भात गंभीर नसल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आगामी काळात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
'ओबीसी समाज राजकिय आरक्षणाला मुकला'
राज्यातील ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाज राजकिय आरक्षणाला मुकला असल्याचा आरोप, विरोधकांकडून केला जात आहे. तर, सत्ताधाऱ्यांनी यासाठी मागील सरकार दोषी असल्याचा आरोप केला आहे. मात्र, आता सरकारमधील ओबीसी आमदार आणि नेतेच सरकारला ओबीसीचे राजकीय आरक्षण गमावण्याची जबाबदार धरत आहेत.
'फडणवीस सरकार मध्ये ओबीसींच्या हिताचे निर्णय झाले'
भारतीय जनता पक्षाच्या सरकारपेक्षा सध्याचे महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी केला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना, ओबीसी महासंघाने केलेल्या अनेक मागण्यांची त्यांनी दखल घेतली होती. त्यांच्याच काळात ओबीसी मंत्रालय स्थापन झाले होते. मात्र, या सरकारमध्ये अद्यापही ओबीसीच्या मागण्या पूर्ण झाल्या नसून, केलेल्या घोषणाही हवेत विरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.