नागपूर - 'कोरोना'च्या अफवेमुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे चिकनची विक्री आणि दर निम्म्यावर आले आहेत. कोरोना व्हायरसने चीन आणि लगतच्या देशात थैमान घातले आहे. पक्षांचे मांस खाल्याने कोरोनाचा संसर्ग होतो, अशी अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जाते. चिकन खाल्याने कोरोना होतो या भीतीमुळे अनेकांनी चिकन खाणेच बंद केले आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम राज्यातील पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांवर झाला आहे.
'कोरोना'च्या अफवेमुळे गेल्या १५ दिवसात कोंबड्यांच्या विक्रीत ६० टक्क्यांनी घट झाली आहे. ग्राहकांची मागणी घटताच १० दिवसात चिकनचे दर हे ४५ रुपये किलोवर आले आहेत. एकट्या नागपूर जिल्ह्यात आठवड्याची विक्री ३०० टनांवरून १५० टनांवर आली आहे. १० दिवसात चिकनचे दर निम्म्यावर आल्याने पोल्ट्री उत्पादक शेतकरी आणि चिकन विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसला असल्याची माहिती विदर्भ पोल्ट्री फार्म असोशियशनचे अध्यक्ष राजा दुधबडे यांनी दिली.
कोरोना व्हायरस हा कोंबड्यांमध्ये नसतो. तसेच आपल्या देशात बहुतांश लोक मांसाहार हा पूर्णपणे शिजवून खातात. कोरोनाचे विषाणू हे कमी तापमानात वाढतात. आपल्या भागातील तापमान हे कोरोना वाढीसाठी अनुकूल नाही. त्यामुळे अशा खोट्या अफवांवर विश्वास न ठेवता लोकांनी शहानिशा करावी, असे आवाहन कृषी अभ्यासकांनी केले आहे.