नागपूर - रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी कमालीची आक्रमक झाल्याचे चित्र आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात नागपुरात निषेध आंदोलन केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. प्रसार माध्यमांच्या अधिकारांवर बंधनं आणून राज्य सरकार एका प्रकारे आणीबाणी लागू करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अर्णब आणि समित ठक्करच्या प्रकरणाच्या माध्यमातून राज्य सरकार राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या मुलीने देखील राज्य सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय.
आणीबाणीच्या काळात 'त्या' सरकारने हजारो लोकांना तुरुंगात डांबले होते. यानंतरच्या निवडणुकीत किंमत त्यांना मोजावी लागल्याचं सांगत हीच परिस्थिती राज्यात सुद्धा निर्माण झाल्याचं पाटील यांनी म्हटलंय. अर्णब गोस्वामींची सुटका होईपर्यंत भाजपा नेते काळी टोपी आणि काळी शाल परिधान करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
मिठागराची जागा ही केंद्र सरकारचीच
मिठागरांच्या सर्व जागा या केंद्राच्या असल्याचा पुनरुच्चार चंद्रकांत पाटलांनी केला. आरे प्रमाणेच कांजूर मार्ग परिसर देखील निसर्गाच्या विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या जागेवर मेट्रो कारशेड तयार करण्याला विरोध दर्शवला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांसारख्या थोर संशोधकांनी ती जागा महाराष्ट्र शासनाची असल्याचा निर्वाळा दिला, असे पाटील म्हणाले. यावर स्पष्टीकरण देताना, केंद्राची-राज्याची आणि सामायिक असे वर्गीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यात मीठागराची संपत्ती ही केंद्राची असल्याचं ठरलं होतं. त्याचे उत्पन्न देखील केंद्राचेच आहे. त्यानंतर पुढे काहीच झालं नाही. मात्र काही विभागीय आयुक्तांनी या संदर्भात हा निर्णय दिला होता. त्याचे अपील माझ्यासमोर झाले होते. या संपूर्ण जमिनीच्या वापरावर स्टे असल्याने त्यावर काहीही निर्णय घेता आला नाही, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली.
जमिनीचा वापर करायचा असले, तर 3700 कोटी रुपये भरण्याची सूचना केली होती. मात्र ते परवडणारे नव्हते. अजूनही त्या जागेवर न्यायालयाचा स्टे असल्याचे पाटील यांनी सांगितले.