नागपूर - शहरातील नंदनवन पोलीस ठाण्यात एका युवकाने चक्क बॉम्ब सदृश वस्तू घेऊन प्रवेश केल्याने चांगलीच धावपळ उडाली होती. मात्र, वेळीच पोलिसांनी बीडीडीएस पथकाला बोलावून ती बॉम्ब सदृश वस्तू निकामी केली. राहूल युवराज पगाडे (२५) रा. साईबाबा नगर, असे या युवकाचे नाव आहे. या युवकाने चक्क युट्यूब बघून ही बॉम्ब सदृश वस्तू तयार केली होती. मात्र, त्यानंतर त्याला ते निकामी करता येत नसल्याने त्यांने ती बॉम्ब सदृष्य वस्तू घेऊन थेट नंदनवन पोलीस स्टेशन ठाण्यात प्रवेश केला. मात्र, या घटनेने पोलीस ठाण्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
व्हिडीओ पाहून बनवली बॉम्ब सदृश वस्तू -
दरम्यान, राहूलने बॉम्ब सदृश वस्तू असलेली बॅग आपल्याला लावरिस पडलेली दिसल्याच सांगितले. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली, तेव्हा त्यानेच तो बॉम्ब युट्यूबवर बघून तयार केल्याची कबुली दिली. त्यानंतर नंदनवन पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करून तो बॉम्ब निकामी केला. राहूलने युट्यूबवर गावठी बॉम्ब बनविण्याचे व्हिडीओ पाहून त्याकरिता लागणाऱ्या साधन सामुग्रीची जुळवाजुळव केली होती. त्यानंतर सर्व वस्तू एकत्र करून त्याने गावठी बॉम्ब तयार केला; परंतु हा गावठी बॉम्ब त्याला निकामी करता येत नसल्याने त्याने ती वस्तू एका बॅगमध्ये भरून ती बॅग नंदनवन पोलीस ठाण्यात घेऊन आला.
अखेर बॉम्ब निकामी करण्यात आला -
नंदनवन पोलिसांनी या घटनेची सूचना बॉम्ब शोधक पथकाला दिली. तेव्हा बीडीडीएस पथकाने तो गावठी बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्कीट बॅटरीपासून वेगळे करून तो निकामी केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा - डोंबिवलीत एक रुपये प्रति लिटर पेट्रोल, नागरिकांच्या लांब रांगा