नागपूर - नागपूर महानगर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक पार पडली. यात भाजपाचे नगरसेवक दयाशंकर तिवारी हे विजयी झाले आहेत. तिवारी यांना 107 म्हणजेच पूर्ण मते मिळाली. नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी यांनी निवडणूक प्रक्रिया दोन तासात होत असताना ऑनलाइन घेत दिवसभर रेंगाळत नेल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या आमदार विकास ठाकरे यांच्या गटाचे रमेश पुणेकर यांना 27 मते तर बसपाचे नरेंद्र वालदे यांना 10 मते मिळाली. अनुपस्थित अपक्ष आभा पांडे, शिवसेनेच्या किशोर कुमेरिया, काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे, बंटी शेळके, गार्गी चोपरा हे अनुपस्थित होते.
अशी झाली निवडणूक
विद्यमान महापौर संदीप जोशी व उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांचे पदाचा राजानामा दिल्यामुळे उर्वरित काळासाठी महापौर व उपमहापौरपदाची निवड करण्यासाठी ही निवडणूक झाली. भारतीय जनता पार्टीकडून महापौरपदासाठी प्रभाग १९ ‘ड’ चे नगरसेवक दयाशंकर चंद्रशेखर तिवारी यांनी नामनिर्देशन सादर केले तर उपमहापौरपदासाठी पक्षाकडून प्रभाग २३ ‘ब’च्या नगरसेविका मनीषा आशिष धावडे यांनी नामनिर्देशन सादर केले. महाविकास आघाडीकडून प्रभाग ३३ ‘ड’चे नगरसेवक मनोजकुमार धोंडूजी गावंडे यांनी महापौरपदासाठी नामनिर्देशन सादर केले. उपमहापौर पदाकरिता आघाडीकडून प्रभाग २८ ‘ब’च्या नगरसेविका मंगलाबाई प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले. बहुजन समाज पक्षाकडून प्रभाग ‘ड’चे नगरसेवक नरेंद्र नत्थुजी वालदे यांनी महापौर पदाकरिता नामनिर्देशन सादर केले आहे. उपमहापौरपदाकरिता पक्षाकडून प्रभाग ६ ‘क’च्या नगरसेविका वैशाली अविनाश नारनवरे यांनी नामनिर्देशन सादर केले. काँग्रेस पक्षाकडून प्रभाग २०‘क’चे नगरसेवक रमेश गणपती पुणेकर यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले. काँग्रेस पक्षाकडून प्रभाग १० ‘ब’च्या नगरसेविका रश्मी निलमनी धुर्वे यांनी उपहापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले आहे.
महानगरपालिकेत पक्षीय बलाबल
- काँग्रेस - २८
- भाजप - १०७
- बीएसपी - १०
- शिवसेना - ०२
- राष्ट्रवादी - ०१
- अपक्ष - ०१