नागपूर: या महिन्याच्या अखेरीस येणा-या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) तयारीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाची नागपूर शहरातही अंमलबजावणी करण्यात येणार आहे. निर्बंध नसले तरी नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती ह्या २ फुटापेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे मोठ्या उंचीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. मात्र त्यांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने कमी उंचीच्याच गणेशमूर्तींची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा व ४ फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जनस्थळीच विसर्जीत कराव्यात, असेही आवाहन त्यांनी केले आहे.नागपूर महानगरपालिकेद्वारे यंदाही शहरातील सर्व तलाव मूर्ती विसर्जनासाठी बंद करण्यात आलेले आहेत. (All lakes closed for Ganesh immersion) त्यादृष्टीने सर्व तलावांचे योग्य बॅरिकेटींग करण्याचे निर्देश आयुक्तांनी झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.