नागपूर - पैशाच्या हव्यासापोटी जुन्या नोकराने डॉक्टरचे अपहरण करून त्यांच्याकडे १० लाखाची खंडणी मागितल्याची घटना नागपुरात घडली आहे. खंडणीचे पैसे मिळत नसल्याने हतबल झालेल्या आरोपींनी डॉक्टर जवळील पैसे आणि सोन्याच्या मौल्यवान वस्तू हिसकावून त्यांना सोडून दिले. मात्र, पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी प्रीतम वानखेडे आणि रोशन राऊत या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
नागपूरच्या सक्करदरा परिसरात एक्सरे आणि सोनोग्राफी क्लिनिक असलेले डॉ. केदार जोशी नेहमी प्रमाणे रात्रीच्या वेळी घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी ते त्यांच्या कारजवळ आले असता, त्या ठिकाणी असलेल्या दोघांनी त्यांना त्यांच्याच कारमध्ये डांबले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळ असलेली रक्कम आणि दागिने लुटले. त्यांना चाकूचा धाक दाखवत १० लाखाची खंडणी मागितली. मात्र, ती मागणी पूर्ण होत नाही, असे दिसताच त्यांनी डॉक्टरला सोडून दिले. त्यांनतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी डॉक्टरांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपास चक्र फिरविली आणि काही तासातच या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी केलेल्या तपासात प्रीतम वानखेडे हा यांच्याकडे काही वर्षांपूर्वी कामाला होता. डॉक्टरांनी त्याला नोकरीवरून काढले होते. त्या घटनेचा राग त्याच्या मनात होता. झालेल्या अपमानाचा बदला त्याला घ्यायचा होता. त्यासाठी त्याने रोशन राऊत नावाच्या मित्राची मदत घेतली. आरोपींना माहिती होती की डॉक्टर रोज रात्री रक्कम घेऊन जात असतो. त्याचा फायदा घेत त्यांनी हा कट रचला. मात्र, त्यांना यात यश आले नाही. पोलिसांनी प्रीतम वानखेडे आणि रोशन राऊत या दोन्ही आरोपींना अटक केले आहे.