नागपूर - नागपूर शहरातील अंबाझरी येथील सुदाम नगरी भागातील अक्षय जयपुरे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सात ते आठ व्यक्तींनी अक्षयचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. हा खून अवैध व्यवसायाच्या वादातून केला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अंबाझरी पोलिसांनी खून करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
अक्षयची नाशिक येथील कारागृहात रवानगी केली होती
अक्षय अवैध व्यवसायात सक्रिय होता. त्यामुळे त्याच्या विरुद्ध अनेक गुन्ह्यांची अंबाझरीसह अनेक पोलीस ठाण्यात नोंद होती. पांढराबोडी परिसरात अक्षयची मोठ्या प्रमाणात दहशत होती. अक्षयचा वाढता दबदबा लक्षात घेता नागपूर पोलिसांनी त्याची नाशिक येथील कारागृहात रवानगी केली होती. ही शिक्षा संपवून आल्यानंतर अक्षय गुन्हेगारी जगतात सक्रिय झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून अक्षय अवैध दारूच्या धंद्यात उतरला होता. त्यामुळे त्याचे अनेकांसोबत वैर निर्माण झाले होते.
अखेर अक्षय प्रतिस्पर्धी टोळीच्या हाती लागला
अक्षयला ठार मारण्यासाठी त्याची प्रतिस्पर्धी टोळी संधीच्या प्रतीक्षेत होती. काल रात्री अंबाझरी येथील सुदाम नगरी भागात अक्षयवर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये अक्षय रक्ताच्या थारोळ्यात पडला. मात्र, टोळीचे यावर समाधान झाले नाही. त्यांनी त्याचा डोक्यात दगड घातला. ज्यामध्ये त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पुढील तपास सुरू केला आहे.