नागपूर - वाघोबांची संख्या दरवर्षी वाढत आहे. विशेषतः विदर्भात जंगलांमध्ये वाघांची संख्या लक्षणीय ठरत आहे. त्यामुळेच टायगर कॅपिटल म्हणून विदर्भाचा उल्लेख केला जातो, तर आता दुसरीकडे वाघांची शिकार हा देखील गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. केवळ विदर्भचं नाही तर संपूर्ण राज्यात वाघांची शिकार वाढलेली आहे. गेल्या चार वर्षात संपूर्ण राज्यभरात २४ वाघ आणि ५६ बिबट्यांची शिकार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहितीचा अधिकार अंतर्गत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वन विभागाकडे या संदर्भात माहिती मागवली होती. त्याचे उत्तर देताना वनविभागाने चार वर्षात २४ वाघ आणि ५६ बिबट्यांची शिकार झाल्याचे उत्तर दिले आहे.
हेही वाचा - हलाखीच्या परिस्थितीत मुलाने UPSC परीक्षेत मिळवलेले यश पाहून वडिलांच्या डोळ्यांत तरळले अश्रू
- वाघ वाचवा मोहीम फेल -
एकीकडे राज्य आणि केंद्र सरकारने वाघ वाचवा ही मोहीम सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे सरकारच्या योजनेचा कुठेही प्रभाव दिसून येत नसल्याने वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांची हिम्मत वाढलेली आहे. सरकारी उदासीनतेमुळे वाघ वाचवा या मोहिमेला खीळ बसलेली आहे. राज्यात गेल्या चार वर्षात म्हणजे २०१८ पासून तर आजपर्यंत तब्बल २४ वाघांची शिकार झालेली आहे, तर याच काळात ५६ बिबटे देखील शिकारीमुळे मृत्युमुखी पडले आहेत. ही माहिती वनविभागाने एका प्रश्नाचे उत्तर देताना दिली आहे.
- कोणत्या वर्षात किती वाघांचा आणि बिबट्यांची शिकार -
वाघांची संख्या वाढावी या करिता हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. त्याचा परिणाम देखील दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात वाघांची संख्या वाढलेली आहे. मात्र, शिकारीचे प्रमाण देखील वाढलेलं आहे. याकडे वन विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. २०१८ या वर्षात ३ वाघांची शिकार झाली तर ७ बिबट्यांचा शिकारीमुळे मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये वाघांच्या शिकारीची संख्या दुप्पट झाली होती. २०१९ मध्ये तब्बल ६ वाघांची शिकार झाली तर १७ बिबट मृत्युमुखी पडले. २०२० मध्ये वाघांच्या शिकारीचा आकडा ८ पर्यंत गेला तर बिबट्यांच्या शिकारीची संख्या २७ पर्यंत गेली होती. सध्या सुरू असलेल्या २०२१ या वर्षात वाघांच्या शिकारीचा आकडा ७ पर्यत पोहचला असून, ५ बिबट्यांची शिकार झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे.
- शिकारीच्या आरोपाखाली २९ आरोपींना अटक -
गेल्या एका महिन्यापासून नागपूर बोर्ड विभागाने शिकार करणाऱ्यांचे पाळंमुळं खणून काढण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत वन्य प्राणी शिकारीच्या आरोपाखाली 29 आरोपींना अटक केली आहे. विदर्भात अनेक व्याघ्र प्रकल्प असल्याने सर्वाधिक वाघांची शिकार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये सापळा लावून शिकार करणे, विष प्रयोग करणे, विजेचा शॉक देऊन शिकार करण्यासारखे प्रकार उघड झाले आहेत.
हेही वाचा - येत्या 48 तासांत राज्यात अतिवृष्टीचा इशारा