मुंबई - प्रदेश महिला काँग्रेसने गाव तिथे महिला काँग्रेस आणि मोहल्ला तिथे महिला काँग्रेस अशा पद्धतीने काम सुरू करावे, यासाठी राज्यभरात जास्तीत जास्त शिबिरे घ्यावीत आणि घरातील महिलांना आपलेसे करावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून संध्या सव्वालाखे यांनी आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला यावेळी थोरात बोलत होते.
थोरात पुढे बोलताना म्हणाले की, सव्वालाखे यांनी अनेकदा जीवनात कठीण प्रसंग पाहिले आहेत. त्यामुळे त्या पक्षवाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाहीत, असा आपल्याला विश्वास आहे. यवतमाळसारख्या जिल्हा परिषदेचा सर्वात मोठा मतदारसंघ असताना त्यांनी अत्यंत चांगले काम केले. आता त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आली आहे. त्यामुळे तुम्ही चांगले काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. कॉंग्रेसला तळागाळात पोहोचवण्याचे काम तुमच्या हाताने होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो अस थोरात यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसमुळेच मला महिला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली
दरम्यान संध्या सव्वालाखे यांनी पदभाव स्वीकारल्यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, काँग्रेसमुळेच मला महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वप्न पाहता आले आणि आज पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्यातील महिलांची एक प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासोबत काम करेन राज्यभर दौरे करून काँग्रेस महिला संघटन मजबूत करू असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले. तसेच सर्व मंत्र्याकडे वैयक्तिक कामासाठी मी कधी जाणार नाही पण पक्षाच्या कामासाठी जाईन. तसेच राज्यात आपली सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची ताकद वाढवली पाहिजे असे आवाहन सव्वालाखे यांनी यावेळी केले.
कॉंग्रेस नेत्यांनी सव्वालाखे यांना दिल्या शुभेच्छा
प्रदेश महिला काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा चारुलता टोकस यांनी आपण मागील वर्षाच्या कालावधीत केलेल्या कामाची माहिती देत यावेळी प्रास्ताविक मांडले. तर काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, आदींनी यावेळी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांना शुभेच्छा देत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. तर अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी बूथ स्तरावर जाऊन महिलांना एकत्र करा, त्यांचा डेटाबेस तयार करा असे आवाहन केले. महिलांनी एकत्र येऊन संघटन मजबूत केले तर 2024 पासून आपण संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक आणण्याची तयारी सुरु करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.