मुंबई- महाविकास आघाडी राज्य स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी विरोधात कारवाई करतांना दिसून आले आहे. मात्र आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने अप्रत्यक्ष मातोश्री वरच कारवाई केले सारखे बोलले जात आहे. ईडीने आज श्रीधर पाटणकर यांची 6 कोटी रुपयाची 11 फ्लॅट जप्त केले आहे. ठाण्यातील परिसरातील हे फ्लॅट आहे. मात्र श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या राजकारणाचे पडसाद उद्या विधान भवन मध्ये देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
श्रीधर पाटणकर हे डोंबिवली परिसरात राहणारे प्रसिद्ध उद्योगपती आहे. श्रीधर पाटणकर यांचे वेगवेगळे व्यवसाय आहे. यांचा राजकारणाशी थेट संपर्क नसला तरी रश्मी ठाकरे यांचे भाऊ असल्यामुळे त्यांचा संबंध ठाकरे कुटुंबीयांची जोडला गेला आहे. श्रीधर पाटणकर यांचे वडील मोठे उद्योगपती होते.
कोण आहेत श्रीधर पाटणकर?
श्रीधर माधव पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत. श्रीधर पाटणकर हे उद्योजक असून ते डोंबिवलीत राहतात. श्रीधर पाटणकर यांचे वडिल माधव पाटणकर हे देखिल मोठे उद्योजक होते. श्रीधर पाटणकरांच्या ठाणे इथल्या निलांबरी प्रकल्पातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. पुष्कप बुलियन कंपनीच्या विरोधातील मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यात पाटणकर यांचं नाव समोर आलं होतं.
काय आहे प्रकरण?
श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ते साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक असून या कंपनीच्या मालकीच्या 11 सदनिका जप्त करण्यात आल्यात. हमसफर डिलरनं पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटी कर्ज दिले होते. मात्र हमसफर ही कंपनी बनावट असल्याचं ईडीचा आरोप आहे. नंदकिशोर चर्तुवेदी यांची हमसफर कंपनी आहे. त्यांच्याकडून पाटणकरांच्या कंपनीनं विनातारण कर्ज घेतले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी पाटणकरांच्या कंपनीत पैसे दिले. या पैशातूनच ठाण्यात निलांबरी प्रोजेक्टचं बांधकाम करण्यात आले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. 2017 त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.