मुंबई : अरबी समुद्रातील हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीवर मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी कारवाई करणारे एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे हे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी आहेत. जाणून घ्या त्यांच्याविषयी खास माहिती...
अमली पदार्थ प्रकरणांचे स्पेशालिस्ट
समीर वानखेडे एनसीबीच्या मुंबई कार्यालयातील प्रादेशिक संचालक आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली होती. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
2004 मधील बॅचचे आयआरएस अधिकारी
समीर वानखेडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून 2004 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. सुरूवातीला त्यांची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. कामातील नैपुण्य बघून त्यांना विभागाने काही प्रकरणांच्या तपासासाठी आंध्र प्रदेश आणि दिल्लीतही पाठविले होते. अमली पदार्थांशी निगडीत बाबींचे तज्ज्ञ म्हणून वानखेडेंची ओळख आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये मुंबईतील एका ड्रग्स प्रकरणाशी निगडीत कारवाईदरम्यान समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर हल्लाही झाल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते.
समीर वानखेडे क्रांती रेडकरचे पती
अनेकांना हे माहिती नसेल की, समीर वानखेडे हे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. समीर वानखेडे यांनी 2017 साली मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी विवाह केला होता. अत्यंत गुप्तपणे केलेल्या या विवाहाला फक्त मोजकेच पाहुणे उपस्थित होते. त्यांना जुळी मुले आहेत.
हेही वाचा - एनसीबी पथकात 'या' धडाकेबाज अधिकाऱ्याच्या एन्ट्रीने सेलिब्रेटींना भरली धडकी; मराठी अभिनेत्रीचा आहे पती